आमची यशोगाथा
गवंडगाव – निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत चित्र
नाशिक-येवला राज्य मार्गाच्या गडद रेषेपासून निवांत , तिथं साक्षात निसर्गाचं एक अव्यक्त सुंदर रुप भेटतं ,गवंडगाव गाव. सुमारे 650 लोकवस्तीचं हे गाव निवांतपणे विसावलेलं आहे. गावाचं स्वरूप लहान, पण त्याची ओळख मोठी इथली माणसं, संस्कृती, निसर्ग, सृष्टी आणि श्रम यांचं एक अनोखं संमीलन इथे दिसतं.
धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख
गवंडगावची एक खासियत म्हणजे या गावात एकच ग्रामदैवताचं मंदिर, नारायणगिरी महाराज मंदिर , मनुदेवी मंदिर,हनुमान मंदिर व नारायणगिरी महाराज आश्रम जे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहेत हे सर्व केवळ धर्माच्या नाहीत, तर सामाजिक समभावाच्या प्रतीक आहेत.
इथे दोनच मोठे समाज पण दोघेही गुण्यागोविंदानं, आपुलकीनं, एका छताखाली नांदतात. गावात वादाच्या नाही, तर एकोप्याच्या गोष्टी ऐकायला मिळतात.उत्पन्नाचे स्रोत: श्रमशीलतेचं गाव
गावकऱ्यांची मुख्य जीवनरेखा म्हणजे शेती आणि मोलमजुरी.
गावाचा पूर्व भाग म्हणजे एक बागायती शेताचं स्वप्न,पालखेड कालव्या मुळे इथे शेती भरभराटीला आली आहे. मका,कांदा,भाजीपाले ,वेलवर्गीय पिकं, यासारख्या पिकांची हिरवळ नजरेत भरते.तर गावाचा पश्चिम भाग मात्र वेगळ्या वाटेवर ,तिथं औद्योगिक वसाहत उभी राहत आहे. ही नवी दिशा गावाच्या भविष्याला नवी पहाट देणारी आहे. रोजंदारी, लघुउद्योग, प्रशिक्षण केंद्रं अशी काही स्वप्नं तिथं मूळ धरू लागली आहेत.